माझे आजोळ - बिसूर. भाग 1
आजोळ - बिसूर : भाग १
'लहानपण देगा देवा’ असे म्हटले आहे ते मला अगदी योग्य वाटते. अजाण, कोवळ्या अशा या वयातील जबाबदारी नसलेले आयुष्य म्हणजे देवाने मानवाला दिलेली भेटच. बालपण ही आयुष्यातील अशी एक गोड पहाट असते, जी कधीच विसरता येत नाही. त्यातही ज्यांचे बालपण आजोळी गेले, त्यांना नशीबवानच मानले पाहिजे.
‘पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या’ असे स्वप्नवत मामाचे गाव माझ्यासाठी माहेरहून कमी नाही. माझे बालपण अशाच एका सुंदर, संथ आणि मायेने वेढलेल्या आजोळच्या गावात गेले. आज मागे वळून पाहताना, डोळे मिटले की सर्वांत आधी डोळ्यांसमोर उभा राहते माझे आजोळ… ‘बिसूर’चा निसर्गरम्य परिसर.
बिसूर गावच्या अगदी जवळून एक खळाळत वाहणारा ओढा जायचा. तो अजूनही आहे. हा ओढा म्हणजे आमच्या बालपणाचा जिव्हाळ्याचा मित्र होता. त्या काळी ओढ्याला बारा महिने पाणी असायचे. पात्र अगदी रुंद, एका बाजूला गाव तर दुसऱ्या बाजूला शेती आणि माळ. माळावर विठ्ठल आणि बिरोबाचे मंदिर. तिकडे माळावर जायचे असल्यास ओढ्यातून जावे लागे. आम्ही वाटच पाहायचो की कधी ओढ्यात जायला मिळते. पावसाळ्यात ओढ्याला पूर यायचा. इतर वेळी पाणी कमी असले की तळाशी असलेले खडक, वाळू पूर्ण दिसायची. पाण्यातून चालत ओढा ओलांडून जाणे म्हणजे आनंद आणि सुख. पाण्याचा थंडगार स्पर्श मनाला अतीव समाधान द्यायचा. तिथून निघावेसे वाटत नसे.
शनिवारी सकाळची शाळा सुटली की मी शाळेचा गणवेश धुवायला ओढ्यावर जाणार. मनसोक्त पाण्यात खेळून झाल्यावर भुकेची जाणीव झाली की मग घरी परतायचे. मैत्रिणींबरोबर ओढ्यात गौराई भरायला पण जायचो. तेव्हा बिसूर गावाला पाणीटंचाई होती. त्यामुळे ओढ्यातील पाणी खर्चासाठी घागरीने भरले जायचे. घागरीने पाणी आणून घरातील रांजण भरणे हा नित्यनेम. गावातील बायका धुणे धुण्यासाठी ओढ्यावर यायच्या. मोठ्या खडकावर पाण्यात उभे राहून धुणे धुताना त्या कामाचे ओझे वाटायचे नाही. बऱ्याचदा ओढ्यात वाळूमध्ये हाताने खोल खड्डा काढून झरा तयार केला जायचा. त्यातले पाणी एकदम स्वच्छ असायचे. या ओढ्यात मी आणि माझी बहीण सोनी खूप वेळ खेळत असू. शेवाळावरून घसरण्याचा खेळ पण चाले. उन्हाळ्यात पाय बुडवून बसणे असो, की पावसाळ्यात त्याचे वाढलेले पाणी काठावरून कौतुकाने पाहणे असो, या ओढ्याने माझ्या बालपणातील अनेक सुख-दुःखांचे क्षण पाहिले आहेत.
या ओढ्याच्या पलीकडे नजर टाकली की पसरलेला दिसायचा तो ‘बिरोबाचा माळ’. मोकळी हवा, उन्हाळ्यातली वाळलेली पिवळी धमक मुरमाड माती आणि पावसाळ्यात उगवलेले हिरवेगार गवत! हा माळ म्हणजे आमच्यासाठी खेळाचे मैदान होते. तिथे मनसोक्त धावणे, बहिणी आणि मैत्रिणींसोबत हुंदडणे आणि निसर्गाचा मुक्त आनंद घेणे, यात दिवस कसा निघून जायचा हेच समजत नसे. या माळावर गावातील काही बायका शेणी लावत. मी आणि सोनीने उत्सुकतेपोटी आणि आजीला सरपणासाठी मदत होईल म्हणून शेण गोळा करून शेणी लावण्याचा उद्योग पण केला. पण ते जास्त दिवस जमले नाही. याच माळावर एक पोल्ट्री होती. तिथे अंडी आणायला जावे लागे, पाच पैशाला एक अंडे मिळायचे. ओढा ओलांडून फुफाट्याच्या रस्त्याने चालत जाऊन अंडी आणणे हे काम नेहमीचेच. परत येताना क्षणभर पाण्यात खेळणे व्हायचेच. त्या काळात भांडी घासण्यासाठी मुरूम वापरला जायचा. तो आणायला प्रत्येक रविवारी माळावर जावे लागायचे. या माळावर बऱ्याचदा भटक्या लोकांची पाले पडायची. शाळेतील स्काऊट-गाईडचे शिबिर याच माळावर झाले होते. तेव्हा सर्वांनी मिळून हा माळ स्वच्छ केलेला आठवणीत आहे. आजही माळ आणि ओढा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. आज माळावर वस्ती वाढली, घरे झाली. ओढा पण आता आधीसारखा राहिलेला नाही. बिसूरला गेल्यावर मात्र मन या आठवणींत गुंतून पडते. वाटते की काळाने पुन्हा मागे जावे आणि मी माझे प्रतिबिंब ओढ्याच्या त्या स्वच्छ पाण्यात डोकावून पाहावे.
🖋️ सौ. अमिता विक्रमसिंह पाटील, मनपाडळे.

अभिप्राय आणि सूचनांचे स्वागत! 🖋️🙏
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लेखन, 💐
उत्तर द्याहटवाछान 👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लिहिले आहेस. उत्तम!, पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा, इथून पुढे अशीच लिहीत रहा. 👌👍😊📖
उत्तर द्याहटवा