चवीपुरतं लोणचं

चवीपुरतं लोणचं साधंसुध पिठलं भाकरीचं जेवण असो किंवा अगदी पंचपक्वानाचं त्या जेवणाची चव वाढवायला लोणचं नावाचा छोटासा पदार्थ किती जमेची बाजू उचलतो ना! चटपटीत चवीचं लोणचं ताटात असलं आणि ते चवीनं खाणारा असला की सगळंच जमून जात. आजकाल छोट्या वाण्याच्या दुकानापासून ते मोठमोठ्या मॉल पर्यंत या लोणच्याने आपली जागा व्यापली आहे. विविध प्रकारचे, चवीचे अनेक लोणची गृहिणीच्या मनाला आनंद देतात कारण तिने केलेल्या स्वयंपाकाला लोणच्यामुळे एक वेगळाच साज चढतो. आंबा,मुळा,लिंबू,मिरची या मंडळींचा लोणच्याचा प्रांतात विशेष अधिकार आहे. यांच्या बरोबरीने कधीकधी गाजर,बोर ही मंडळी सुद्धा अलगदपणे मसाल्यात बुडून स्वतःला लोणचं म्हणवून घ्यायला तयार होतात. या सर्वावरून आठवलं पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये कुरड्या- पापड्या याबरोबरीने घरोघरी लोणचे घालण्याची लगबग उडायची. आंब्याचे लोणचे घालण्यासाठी लागणारा आंबा हा खास करून 'लोणच्याचा आंबा' या नावानेच परिचित असतो. गावामध्ये तर कुणाच्या दारात किंवा शेतात लोणच्याच्या आंब्याचे झाड असेल तर त्यांना आधीच सांगून ठेवले जायचे. शेकड्याने असे आंबे आणून रात्री पाण्यात ठेवले जायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील बायकांची गडबड उडायची. कारण या आंब्यावरती वेगवेगळे सोपस्कार पार पाडावे लागायचे. आंबे धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घेतले जायचे. लोणच्याचे आंबे कापायच्या विळीने ते आंबे कापले जायचे आणि त्याचे तुकडे केले जायचे. त्याचवेळेला ते तुकडे स्वच्छ कपड्याने पुसले जायचे. मध्येच एखादा पाडाचा आंबा मिळेल या भोळ्या आशेने लहान मुलं तिथे ठिय्या देऊन बसून राहायचं. ताई - दीदीने तर तिखट मीठ लावून एखादा आंब्याचा तुकडा चाखलेला पण असायचा. तर हे सगळं काम तासभर चालायचं. त्यानंतर लोणच्याचा मसाला आणि आजी,आई, काकी, काकू, मावशी यांच्या हाताची करामत व्हायची आणि मस्त लोणचे चिनी मातीच्या बरणीत स्थिरावायचं. अशा पद्धतीने पुढील वर्षभर घरच्या चवीचं लोणचं मिळायचं. पण या सगळ्यात एक कोड मला आजपर्यंत उलघडलं नाही की, आंबे फोडून स्वच्छ करताना कोयी आणि त्यातील निघालेली इतर कचरावजा घाण घराबाहेर चौकात, रस्त्यावर का बरं टाकली जात असावी? आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरातील लोणच्याची चव थोडीतरी वेगळी असतेच. आताच्या जॅम जेली च्या जमान्यातील मुलांना या लोणच्याची चवदार कहाणी माहीतच नसेल कदाचित. आजकाल तेवढा वेळ ही नसतो आणि तयार लोणच्यामध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत मग काम सोप्प झालं ना. लिंबू असो वा मिरची, किंवा मुळा प्रत्येक प्रकारचे लोणचे करताना असे बरेच सोपस्कार पार पाडावे लागतात तेंव्हा कुठे ते ताटात सजवायला मिळतं. या लोणच्याने भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पण मान मिळवला आहेच. तर हे झालं लोणचं पुराण! जरा खोलवर विचार केला तर आपल्या आयुष्यात सुद्धा काही माणसं ही या लोणच्या प्रमाणे असतात. आपल्या प्रेमानं, विश्वासाने, आधाराने त्यांना जपता आलं पाहिजे फक्त. त्यांच्या सोबतीनं जीवनाची गोडी चाखायची असेल तर मनातील अढी, गैरसमज सगळं दूर सारायला हवं. लोणचं काय आणि माणसं काय जितकी जुनी होत जातात, मुरत जातात तितकं चांगलंच. चला जेवण आणि जीवन चविष्ठ बनवूया... चवीपुरतं लोणचं                                 

टिप्पण्या

  1. खूप छान लेख आहे, लहानपणीची आठवण करून दिली. शेवटच्या paragraph मधील लिहलेला संदेश फार अनमोल आहे.धन्यवाद आणी खूप खूप शुभेच्छा अमिता.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर लेख , आपल्या आयुष्यात आजूबाजूस अशीच लोणच्यासारखी माणसे असतात त्यांना जपता आले पाहिजे. माझ्या पत्नीस पुढील लेखनास शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इकिगाई