इकिगाई



नुकतेच एक अतिशय सुंदर जगभरातून गौरवले गेलेले पुस्तक वाचले - इकिगाई - दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य. पुस्तक वाचले आणि वाटलं की हे सर्व अविश्वसनीय आहे. इकिगाई हे पुस्तक आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यास जीवनाचे मूल्य समजण्यास मदत करते.

            हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस हे या पुस्तकाचे लेखक आहेत. याचा मराठी अनुवाद प्रसाद ढापरे यांनी केला आहे. दोन्ही लेखक भेटल्यानंतर विविध विषयांबरोबरच जीवन व जीवनाचा उद्देश अशा गोष्टींवर चर्चा केली आणि त्या चर्चेतून 'इकिगाई' हा जादुई शब्दाला आला.

             जपान मधील लोक हे दीर्घायुषी आहेत. त्यातल्या त्यात ओकिनावा प्रांतातील बहुतेक लोक तर शंभरीही पार करतात. पुस्तकाचा लेखकांनी जपानच्या शेकडो शंभरी पार केलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांनी त्यांच्या तरुण आणि आनंदी राहण्याचे रहस्य उलघडले. जपानी लोकांचे खाणे पिणे त्यांची काम करण्याची पद्धत अशा गोष्टींची अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहे.

या पुस्तकात इकिगाईची संकल्पना आणि ती जपानी लोकांना वृद्धापकाळातही निरोगी जीवन जगण्यास कशी मदत करते याची माहिती विस्ताराने दिली आहॆ. मग लेखक वृद्धत्वविरोधी रहस्ये आणि तणाव आपल्या आरोग्याला कसे खराब करू शकतात याचे वर्णन करतात. त्याचबरोबर लोगो- थेरपीच्या संकल्पना आणि केस स्टडीजचे वर्णन केले आहे जिथे लोकांना त्यांचा उद्देश सापडला. मोरिटा थेरपीची मूलभूत तत्त्वे देखील स्पष्ट केली आहेत. पुढील प्रकरणामध्ये, लेखक कार्यप्रवाह समजावून सांगतात, तीन टप्पे ज्याद्वारे कामात प्रवाह साध्य केला जाऊ शकतो आणि प्रवाहाच्या मदतीने तुम्ही तुमची इकिगाई कशी शोधू शकता हे स्पष्ट करतात.

जपानी शतायू लोक आणि त्यांचे तत्त्वज्ञान, सवयी, जीवनशैली आणि आहार याबद्दलची माहिती आपल्याला अचंबित करते. त्यानंतर पुस्तकात जपानी लोकांचे काही योग आणि व्यायाम स्पष्ट केले आहेत ज्यामुळे ते निरोगी राहतात. शेवटच्या प्रकरणामध्ये लवचिकता आणि नाजुकपणाची संकल्पना आहे, जी जीवनातील आव्हाने खचून न जाता हाताळण्यास मदत करू शकते. पुस्तकाचा शेवटी इकिगाईचे दहा नियम सांगितले आहेत. जे अतिशय मोजक्या शब्दात आहेत पण आपल्याला मंत्रमुग्ध करतात.

ते दहा नियम मी इथे थोडक्यात तसेच्या तसेच देतेय-

 कायम कार्यरत रहा आणि कधीही निवृत्त होऊ नका - आपल्या आवडीची गोष्ट करणं थांबवू नका, ज्यात आपल्याला आनंद आहे ती गोष्ट करताना निवृती किंवा वयाचा विचार मनात आणू नका 

 निवांत रहा - कायम धगधगीच आणि धावपळीचे जीवन हे दीर्घायुष्याला घातक आहे. विनाकारण घाईगडबड न करता काम केल्यास जगण्याला नवा अर्थ मिळू शकतो.

 तुमचं पोट भरू नका - याचा संबंध जेवणाशी आहे. आपल्या दीर्घायुष्याचा संबंध आपल्या जेवणाशी असतो. आपल्याला जेवढी भूक असते त्यापेक्षा कमी जेवा.

चांगला मित्र परिवार - मित्रां सारखं चांगलं औषध नाही. त्यांच्याशी गप्पा मारा, मनमोकळेपणाने बोला, सली घ्या सल्ले द्या, मजा करा स्वप्न बघा…. थोडक्यात काय तर जीवन जगा.

 पुढच्या वाढदिवसाला जास्त तंदुरुस्त व्हा - दीर्घायुष्य हवा असेल तर शरीरही कायम कार्यरत ठेवावा लागत. त्यामुळे व्यायामाला पर्याय नाही.

 हास्य- हसतमुख स्वभावाने मित्र तर बनतातच, त्याचबरोबर शांतताही मिळते. लहान सहान गोष्टींमध्ये ही आनंद शोधायला हवा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की ' आत्ता आणि इथे ' हाच असा क्षण आहे ज्या या क्षणात जगायचं आहे.

 निसर्गाशी जोडले जाणं - आजच्या युगामध्ये जरी जास्तीत जास्त माणसं शहरांमध्ये राहत असली तरीही आपली निर्मिती निसर्गाबरोबर राहण्यासाठीच झालेली आहे. त्यामुळे अधून मधून निसर्गाच्या सानिध्यात जा.

 धन्यवाद द्या - तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला शुद्ध हवा आणि खाण्यासाठी अन्नाची सोय करून दिली त्यांना धन्यवाद द्या. तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ज्यांनी या सुंदर जगामध्ये जगण्याची आणि त्याला अधिक सुंदर बनवण्याची शक्ती दिली, या सर्वांना दिवसातून एकदा तरी धन्यवाद द्या. यातून नक्कीच आनंद जाणवेल.

 वर्तमानामध्ये जगा - भूतकाळाविषयी दुःख करणं आणि भविष्याची चिंता करणं सोडून द्या. आपल्याकडे फक्त वर्तमान आहे. सर्वोत्तम फायदा घ्या आणि या क्षणाला अविस्मरणीय बनवा.

 तुमच्या इकिगाईप्रमाणे वागा - तुमच्या प्रत्येकाच्या आत मध्ये एक प्रेरणा दडलेली असते. प्रत्येकाकडे काहीतरी असं असतं जे विशेष आहे आणि तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला प्रेरित ठेवतं. जर तुम्हाला तुमचा एकही काही माहीत नसेल तर तुमचे ध्येय इकिगाई शोधण्याचं ठेवा.

 अशा दहा यांचे वर्णन करून आपल्याला दीर्घायुषी आनंदी आणि उद्देशी पूर्ण जीवन लाभण्यासाठी सदिच्छा देऊन लेखकांनी पुस्तकाचा समारोप केला आहे.

 पुस्तक वाचून संपल्यानंतर मला असे जाणवले की आपण प्रत्येकाने आपल्या इकीगाईचे अनुसरण केले पाहिजे. इकीगाई या शब्दास मराठी किंवा इंग्रजी प्रतिशब्द नाही हा मूळ जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ जगण्याचे कारण, जगण्याचा अर्थ असा होतो. इकिगाई असणे म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक करणारे स्पष्ट हेतू असणे. तुमची इकिगाई ती गोष्ट असेल जी तुम्हाला आवडते, ज्याच्यात तुम्ही चांगले आहात, ज्याच्यातून तुम्हाला जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळू शकतात आणि जगाला ती गोष्ट आवश्यक आहे. तर हे चारही घटक ज्या गोष्टीस लागू होतात ती गोष्ट तुमची इकीगाई आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला चित्र काढायला खूप आवडत असेल आणि ते तुम्ही चांगले काढत असाल, चित्र काढल्याने तुम्हाला पुरेसे पैसे मिळत असतील आणि लोकांना सुद्धा तुमचं चित्र आवडत असेल तर चित्र काढणं ही तुमची इकीगाई असू शकते.

म्हणून प्रथम तुमची इकिगाई म्हणजे जीवनाचा उद्देश शोधला पाहिजे. उद्देश पूर्ण करण्यासाठी कृती केली पाहिजे पण त्यावेळी कंटाळवाणे वाटणार नाही. कारण आपण आपल्या आवडीचं काम करत असतो. आपल्याला आपल्या जगण्याचा उद्देश कळला की आपण करत असलेले काम कितीही वर्ष करत असू तरी त्यामध्ये कंटाळा अजिबात येणार नाही. इकिगाई पुस्तक नक्कीच एक वेगळा पैलू घेऊन आपल्यापुढे येत. 

या पुस्तकाने मला या जीवनात थोडे शांत होण्याचे, आहे त्या क्षणात असण्याचे आणि माझ्याकडे असलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्त्व मला पटवले. या पुस्तकाने मला शांततेने जगण्यास, मैत्री करण्यास आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यास मदत केली. हे पुस्तक ही एक प्रकारची जादू आहे, ज्याने मला जाणीव करून दिली की काळजी करण्यासारखे काहीही नाही तर फक्त आनंदी राहण्यासाठीच सगळं काही आहे. जगण्यात कितीही चढ उतार आले तरी आपण खचून नं जाता आपल्या इकीगाईप्रमाणे काम करत रहायचं. पुस्तक वाचून खूप आनंद झाला आणि आपल्याला जे आवडलं ते इतरांना सांगणं हे कदाचित माझं इकिगाई चं असावं म्हणून लिहावं वाटलं.

वाचून पहा पुस्तक.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चवीपुरतं लोणचं