आनंद छंद


ज्यांनी आयुष्यात ध्येय ठरवलंय आणि एकलव्या सारखी तीक्ष्ण निष्ठा ठेवून त्यात यश मिळवलंय अशा व्यक्तींकडे अनुभवांची प्रचंड शिदोरी असते. आयुष्याची जडणघडण होताना भेटलेली माणसं, घेतलेले अनुभवी त्यांच्या आयुष्याला समृद्ध करत असतात.

प्रत्येकाला ईश्वराने अनेक क्षमता सढळ हस्तानं बहाल केलेल्या असतात. पण प्रत्येकाला त्या वापरता आलेल्या नसतात. याची खंत प्रत्येकाला कधी ना कधी वाटतेच. कित्येक जण आपल्याकडे क्षमता तपासून पाहायचेही राहतात. कारण जगण्याच्या रहाटगाड्यामध्ये बांधिव आणि व्यस्त दिनक्रमामुळे स्वतःकडे वळून बघणं राहूनच जातं. मग आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचतो की, तेव्हा वाटतं अरेच्चा! माझं हे करायचं राहिलं, माझ्याकडे ती क्षमता होती, माझ्याकडे तो गुण होता, प्रयत्न केला असता तर मी ही आज एक चांगला चित्रकार, लेखक, कवी, गायक झालो असतो.

 आपल्यातील प्रतिभा ओळखायला आपल्याकडे वेळच नसतो. जेव्हा वेळ असतो तेव्हा जगण्याच्या अनिवार्य धकाधकीत आपण वयाच्या अशा वळणावर पोहोचलेलो असतो की, छे! या वयात आता काय शिकायचं? लोक काय म्हणतील? अशा विचारांनी आपण स्वतःला त्या विचारापासून, इच्छेपासून दूर नेतो.

खरंच  अंतरीच्या यातील इच्छेचा अपमान करू नका, राहून गेलेल्या पण अतिव आनंद देणाऱ्या अशा गोष्टी, असे छंद जरूर पुरे करायचा प्रयत्न करा. लोक काय म्हणतील हा विचार सरळ पुसून टाका. कुणी काय बोलत असेल तर त्याकडे सरळ दुर्लक्ष करा. नाहीतर भविष्यातल्या सुंदर क्षणांना, तुमच्यातील अविष्काराला तुम्ही मुकाल. जीवन सुंदर आहे ते सुंदरतेने आणि मनमुरादपने जगायचा प्रयत्न करा. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चवीपुरतं लोणचं

इकिगाई