आई

 


आज आईला जाऊन एक वर्ष झाले. जणू एक वादळी आयुष्याचा प्रवास थांबला. व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्याबद्दल जास्त खोल आतून विचार सुरु होतो. सोबत असताना प्रेम, काळजी, विश्वास सगळं असतं. पण एक व्यक्ती म्हणून तितका विचार केला गेलेला नसतो. आता जेंव्हा आई सोबत नाही तेंव्हा कळतं की ती अप्रतिम स्त्री होती. सुशिक्षित, सुविचारी, कष्ट करत राहणारी, हसतमुख आणि विनोदबुद्धी असलेली.सोबत उत्तम माणूस. 

आई आमच्या कुटुंबाला व्यापून राहिली…आयुष्यभर. तिच्या शिवाय घर, शेती, व्यवहार सगळं म्हणजे शून्य. आता वाटतं तिने या व्यवहारपूर्ण, समंजस, सदसदविवेक बुद्धीने वागण्याची सुरुवात कुठून तरी केली असणार. अनुभव घेत घेत ती अशी बनली असणार. तिच्या वागण्याचा, बोलण्याचा पायचं मुळात समजूतदार आणि माणुसकी त्यामुळे तिने कधीच कुणालाही दुखावले नाही. 

जुन्या काळातील मॅट्रिक मेरिट मध्ये पास असं तिचं शिक्षण. वाचन, रांगोळी यांचे वेड. वडिलांच्या अतिशय शिस्तप्रिय आईच्या प्रेमळ वातावरणात तिचं बालपण गेलं. वडिलांसोबत सर्वत्र फिरल्यामुळे तिला समाजभानही चांगले होते. 

ती जेव्हा पप्पांसोबत लग्न होऊन मौजे वडगावला आली सामान्य मुलींसारखीच संसाराची घर कामाची तिलाही सवय नव्हतीच. आमच्या आजोबांच्या एका पत्रावरून याबद्दल कळते. लग्ना अगोदर  जेवलेली गोष्टी ताटे सुद्धा ती चिमटीने उचलायची असे आजोबा लिहितात. आणि त्याचबरोबर  आपल्या मुलीला म्हणजे आईला ते सांगतात की,’ आता जबाबदारीने वागावयास हवे’. तिथून पुढे ते शेवटपर्यंत तिने ती जबाबदारी सार्थपणे पेलवली. 

तीच आणि पप्पांचे आयुष्य सोपं नव्हतं. आजूबाजूच्या आपल्याच लोकांच्या स्वभावामुळे, वागण्यामुळे त्यांना अनेक अडचणीतून जावं लागले. तरीही आम्हा सगळ्यांना शिकवून व्यवस्थित मोठे केले. 

आधी राहते घर एक वाडा होतं. शेतीचा, घराचा मोठा पसारा. वाड्यात परड्यात आड. त्याचे पाणी रहाटाने ओढावे लागे. स्वयंपाक, धुणे, भांडी, झाड लोट अशी सगळी कामे असायची. छोट्याशा घरात आजी पप्पा आणि आई राहतं. आम्ही सगळे आजोळी शिकण्यासाठी राहत असू. नंतर ताई, मामा, धैर्यशील वं सोनी पण मौजे वडगाव मध्ये सोबत असत. मी सुट्टीला जायचे. आपलं घर सोडून बाहेर कुठं रहायला जायचं नाही म्हणून पडत असलेल्या वाड्यात, पत्र्याच्या घरात अतिशय अडीअडचणीत आईने संसार केला. काटकसर केली पण कुणाला काही कमी पडू दिले नाही. सर्व मावशा, सावर्डे चे जुने पाहुणे याची पण जपणूक केली.

मला जाणवलेली आई म्हणजे खूप हुशार पण नम्र, जितकी धाडशी तितकी काळजीवाहू. तिने पप्पा ना सार्थ साथ दिली. दोघांना आम्ही दिलीपकुमार मधुबाला म्हणतं असू. पप्पांसोबत तिच्या शेती, अर्थकारण, राजकारण, सिनेमा, जुनी गाणी अशा विषयांवर गप्पा रंगायच्या. 

माझं पुर्ण शिक्षण झाल्यावर मी कायमची वडगाव ला आले. आई जास्त जवळून समजू ळ लागली. तिने केलेला प्रत्येक पदार्थ मग तो गोड किंवा तिखट अप्रतिम असायचा. तिची डाळीची आमटी आणि कढी मला खूप आवडायची. दिवाळीत झाऱ्याने बुंदी पाडून मोतीचूर लाडू करतांना ती कढी दमली नाही.

वयाच्या एक टप्प्यावर संधिवात सारखा आजार वाट्याला आला पण त्यामुळे ती कधीच नाराज नाही झाली. किंवा दुखणं गोंजारात नाही बसली. तिच्या अफाट सहनशक्तीला वंदन. तसले दुखणे घेऊन ती सतत कामात असायची. निवडायची, पाखडायची, दळायची…सगळं आनंदाने. कधी निराश नाही किंवा कधी मला हे नाही ते नाही असंही नाही. पूर्ण समाधानी आणि आनंदी राहिली. तिने अनेक माणसे जोडली. घरी आलेल्या कोणताही माणूस रिकाम्या हाताने कधीच परत जात नव्हता. केलेल्या जीवनातील काही ना काही घास ती त्याला देत असायची. म्हणूनच ती गेल्यानंतर आठ दिवसानंतर आलेला हेळवी सुद्धा तिची आठवण काढून रडू लागला. 

एक चांगली पत्नी आणि आई त्याचबरोबर सासू सुद्धा झाली. वहिनींना तिने कधीच कोणता आदेश दिला नाही असं स्वतः वहिनी सांगतात. एका स्त्री ने दुसऱ्या स्त्रीला असं समजून घेता यावं. 

आईला वाचनाचा भारी छंद. ती पुस्तकांबद्दल माझ्याशी खूप बोलायची. लहानपणापासून वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगायची. मी एखाद्या पुस्तक वाचायला घेतलं की  आपणही ते पुस्तक वाचायची. मला एखादं चांगल्या पुस्तकाचे नाव ती सुचवायची. ती जाण्या अगोदर तिने लेखक उत्तम कांबळे यांचे ‘वाट तुडवताना’ हे पुस्तक वाचून पूर्ण केले होते. 

आईची विनोदबुद्धी अप्रतिम. कोटी करणे, मजेने बोलणं तिला खूप छान जमायची. त्यामुळे घरी आनंदी वातावरण राहायचे. तिला ते सगळं कसं सुचायचं काय माहित. आता ती जाण्याच्या आधी सुद्धा तिने विनोद केले होते. 

आता जेव्हा ती नाही तेव्हा  तिच्याबद्दल विचार करताना  वाटतं की  आयुष्यात काही कमवायचे असेल तर ते समाधन. सगळं असूनही साधं राहणं, सर्वांशी प्रेमाने बोलणं, वागणं हाच खरा सुशिक्षितपणा. कसलाही बडेजावं न करता आपलं काम करत राहणं हेच आईच्या आयुष्याचं गणित होतं. ती उत्तम आणि परिपूर्ण जगली. कधीच उदास किंवा नकारात्मक राहिली, बोलली नाही. किंवा कुणाबद्दल ही अगदी शत्रू बद्दलही वाईट शब्द काढला नाही. आपल्या बहिणी, त्यांची मुलं, नातवंडे या सर्वांची ती आत्मीयतेने चौकशी करायची. काळजी घ्यायची. मला आणि बहिणींना, मावश्यांना ती नेहमी कॉल करायची. तिच्यात असलेले हेच वेगळेपण आहे. आधारवड प्रमाणे आमचं पूर्ण आयुष्य व्यापून राहिलेल्या आई शतशः प्रणाम!

सौ. अमिता विक्रमसिंह पाटील 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इकिगाई

चवीपुरतं लोणचं